नाशिक : जुने नाशिक भागातील गोदाकाठालगतच्या पश्चिम विभागातील प्रभाग-१३मध्ये जुने वाडे सातत्याने कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सोमवार पेठेतील खांदवे गणपतीजवळील मैंद वाड्याच्या भींतीचा मोठा भाग गुरूवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास कोसळला. यावेळी वाड्यात असलेल्या एका तरूण भींतीचा मलब्याचा मार लागल्याने किरकोळ जखमी झाला. रहिवाशांनी प्रसंगावधान राखून वाड्याची भींती कोसळण्यापुर्वीच सुरक्षितरित्या उंबरा ओलांडल्याने ते बचावले.याबाबत महापालिका अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, सोमवार पेठेत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मैंद वाड्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात कोसळला. याबाबत ‘कॉल’ येताच तत्काळ मदत मुख्यालयातून पाठविली गेली. अग्निशमन दलाचे जवान पोहचले असता तेथे वाड्याच्या भींतीचा संपूर्ण भाग कोसळलेला होता. जवानांनी वाड्याची पाहणी करून काही धोकादायक झालेला भाग लोखंडी बारच्या सहाय्याने पाडला. तसेच रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. दरम्यान, वाड्याची भींत थरथरू लागल्याचे लक्षात येताच वाड्यातील रहिवाशी तत्काळ बाहेर आले अन् क्षणार्धात वाड्याची भींत धपकन खाली आली. रहिवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे या दुर्घटनेत जीवीतहानी टळली; मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कल्पेश मैंद नावाचा युवक किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बच्छाव यांनी सांगितले.