नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख फाटा येथील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात एक जण उपचारादरम्यान ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.७) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पाडळी देशमुख ते विल्होळी दरम्यान सुरू असलेली अपघातांची मालिका कधी खंडित होणार असा प्रश्न येथील नागरिकात उपस्थित होत आहे.नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे एका हॉटेलजवळ नाशिकहून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या टेम्पोने (एमएच०५ डीके १०३४) समोरून चाललेल्या कंटेनरला (एमएच ४६ एएफ २०८३) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजेश दुलाल शेख (४२) व गौतम अथुनी हजमा (४०) दोघेही रा. उल्हासनगर, मुंबई हे गंभीर जखमी झाले. वाडीवºहे पोलीस ठाण्याचे कर्मचारी मौले, परदेशी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी अपघातात जखमी झालेल्यांना नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल केले. दरम्यान, राजेश दुलाल शेख याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पाडळी फाटा ते विल्होळी दरम्यान गेल्या दोन महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची व वाहनांची वर्दळ कमी असतानादेखील चार ते पाच व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. मुंबई-नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलीही वाहने धावत नसताना महिन्यामध्ये चार ते पाच अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून, यामध्ये निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांची मालिका अशीच सुरू राहणार की खंडित होणार असा प्रश्न नागरिक करीत आहेत. व्हीटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाडळी फाट्यानजीक अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 10:50 PM