नाशिक : द्वारका सर्कल परिसरात मुंबई नाक्याच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकीने (एमएच१५ डीके ३४२६) धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२० ) घडली. दरम्यान, चारचाकी चालकाने पोलिसांना माहिती न देताच घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकलहरे येथील मच्छिंद्र दिलीप जावरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचे सासरे किसन लाला सैंदाणे नाशिकरोडकडे जाण्यासाठी द्वारका सर्कल येथे रस्ता ओलांडत असताना येथील सिग्नलवर मुंबई नाकाच्या बाजूने येणाऱ्या चारचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात सैंदाणे गंभीर जखमी झा्ल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.