इंदिरानगर : एटीएम केंद्रात एका ज्येष्ठ नागरिकाला अदलाबदल करत एका भामट्याने मदतीचा बनाव करून तब्बल १ लाख ५०० रुपयांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर भागात घडला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिक मुनीरोद्दीन कासम शेख (६४, रा.कुतुब सोसायटी, अशोकामार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील एका एटीएम केंद्रातून मिनी स्टेटमेंट प्राप्त करून घेत असताना सेवानिवृत्त शेख यांना काही तांत्रिक अडचणी जाणवत असल्याचे बघून त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका भामट्याने मदतीचा बहाणा करत डेबिट कार्डाची अदलाबदल करून घेतली तसेच त्यांचा गोपनीय क्रमांक जाणून घेत एटीएम केंद्रातून पोबारा केला. हा प्रकार बापू बंगल्याजवळ एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घडला. त्या संशयिताने साहेबराव शंकर गोडसे यांच्या नावाचे डेबिट कार्ड शेख यांच्या हातावर टेकवून धूम ठोकली. त्यांनी पुन्हा एकदा स्टेटमेंट काढण्याचा प्रयत्न केला असता पावती येत नसल्याने त्यांनीही केंद्रातून काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा मुलगा वसीम यांच्या मोबाइलवर खात्यातून रक्कम काढल्याचा बँकेचा मॅसेज आला. तेव्हा त्यांनी बोधलेनगर एसबीआय बँकेत जाऊन पासबुक भरून घेतले तेव्हा लक्षात आले की, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून १३ फेब्रुवारी रोजी चौधरी प्लाझा येथील आयसीआयसीआय बँकेच्या राजीवनगर एटीएममधून चार वेळा प्रत्येकी दहा हजार रुपयेप्रमाणे ४० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर १४ फेब्रुवारी रोजी आयसीआयसीआय बँकेच्या इंदिरानगर येथील एटीएम केंद्रातून चार वेळेस १० हजार रुपये असे पुन्हा चाळीस हजार रुपये, तर १५ फेब्रुवारी रोजी दोनदा दहा हजार रुपये असे वीस हजार आणि पाचशे रुपये बँक ऑफ महाराष्ट्रच्या इंदिरानगर एटीएममधून काढून घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. यावरून बँकेचे खातेधारक शेख यांची अज्ञात चोरट्याने १ लाख ५०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांकडून एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याची तपासणी करत त्या भामट्याचा शोध घेतला जात आहे.