नाशिक : नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने शेतमालाचा खर्च वाचेल. तसेच ड्रायपोर्टमधून थेट बांगलादेशमध्येदेखील शेतमाल जाईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्लीत गुरुवारी (दि. १०) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी गडकरी बोलत होते. शाल, स्मृतिचिन्ह, पुणेरी पगडी, ५० हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. खासदार सुभाष भामरे यांनी गडकरी यांना पुणेरी पगडी परिधान केली. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मंत्री गडकरी यांना येवल्याची शाल दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती भारती पवार यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह भेट दिले. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. यावेळी गडकरी यांनी सावानाची प्रथा व परंपरा वेगळी असून सावानाने सांस्कृतिक चळवळ अखंडपणे चालविली असल्याने पुरस्कार स्वीकारत असल्याचे सांगितले. यावेळी खासदार रक्षा खडसे, कार्याध्यक्ष संजय करंजकर, ॲड. अभिजित बगदे, धर्माजी बोडके, गिरीश नातू, डॉ. आर्चिस नेर्लीकर, सुरेश पाटील, प्रणव पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन देवदत्त जोशी यांनी केले. प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविक तर आभार डाॅ. शंकर बोऱ्हाडे यांनी मानले.
इन्फो
पुरस्काराच्या रकमेत भर घालून परत
कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराचे ५० हजार रुपये आणि स्वत:चे तब्बल ४.५० लाख रुपये असा एकूण ५ लाख रुपयांचा धनादेश देणार आहे. महाराष्ट्रातील आयआयटीयन व इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन विविध मॉडेल तयार करावे. दर्जेदार मॉडेल तयार करणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस द्यावे, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.
इन्फो
निर्यातदारांसाठी पुरस्कार द्यावा
केंद्रीय मंत्री डॉ. पवार व खासदार गोडसे यांनी एक पुरस्कार सुरू करावा. द्राक्ष व कांदा निर्यात करणाऱ्या नाशिक विभागातील २५ शेतकऱ्यांचा नागरी सत्कार करावा. कृषी क्षेत्रातील कौशल्य, तंत्रज्ञान व ज्ञान हे महाराष्ट्रात नाशिकमधून फैलावत असल्याने अशा पुरस्काराने निर्यातीलाही प्रोत्साहन मिळेल, असे गडकरींनी सांगितले.
फोटो
गडकरी पुरस्कार