नाशिक : शालिमार येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सुरेश विठ्ठल गवांदेला (४५) दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील पंधरा वर्षीय पीडित मुलगी देवळालीला आत्याकडे जाण्यासाठी शालिमार येथे बसच्या प्रतीक्षेत उभी होती. यावेळी सुरेश हा आला आणि त्याने मुलीला आत्याच्या घरी सोडतो, असे सांगून अपहरण करत मुलीवर बलात्कार केला. सदर प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी नराधमाने दिली. या घटनेचा तपास भद्रकाली पोलिसांनी वेगाने करून संशयित आरोपीला अटक केली व दोषारोपपत्र दाखल करून संशयिताला न्यायालयापुढे हजर केले. गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी - फलके यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे दीपशिखा भिडे यांनी सात साक्षीदार तपासले. या खटल्यात फिर्यादी व मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. नराधम सुरेश याने दंड न भरल्यास सक्तमजुरीच्या शिक्षेत दोन वर्षे वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तपासी अधिकारी म्हणून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
बलात्कार प्रकरणी एकास सक्तमजुरी
By admin | Published: October 28, 2016 1:37 AM