नाशिक : रिक्षावर कारवाई टाळण्यासाठी चालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित पोलीस शिपाई दिनेश शेडजी चव्हाण (बक्कल- २४८०) यास रंगेहाथ ताब्यात घेतले. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारातच सदर प्रकार घडला.याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित लाचखोर दिनेश चव्हाण (रा. नाशिक) भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. त्याने रिक्षा (एमएच १५, एफयू २७६०)वर कारवाई करत जप्त केली होती. रिक्षाचालकाने सदरची रिक्षा सोडविण्यासाठी प्रयत्न केले असता, चव्हाण याने रिक्षाचालकाकडे एक हजार रु पयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलीस ठाण्यात चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.रिक्षाचालकाने यासंदर्भात तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार केली. त्यानुसार पथकाने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. यावेळी येथील एका झाडाजवळ चव्हाण याने रिक्षाचालकाकडून एक हजाराची रक्कम स्वीकारली असता पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले.
एक हजाराची लाच घेताना पोलीस ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:07 AM