अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सुमारे साडेपाच हजार हेक्टर जागेत असलेल्या ममदापूर संवर्धन राखीव जंगलात हरणाच्या काळवीट प्रजातीची संख्या एक हजाराच्या पुढे गेली आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात झालेल्या प्रगणनेअंतर्गत सुमारे एक हजार ४२ काळवीट आढळून आले हे शुभ वर्तमान मानले जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी काळविटांच्या संख्येत वाढ झाली आहे. येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, देवदरी, खरवंडी, सोमठाण, रेंदळे या गावांच्या परिसरात विस्तारलेले जंगल काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक वन विभाग पूर्वच्या हद्दीतील येवला वनपरिक्षेत्रांतर्गत या संवर्धन क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. काळविटांची संख्या वाढण्यासाठी त्यांना पोषक असे वातावरण व योग्य त्या सोयी उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण संवर्धन क्षेत्रात ठिकठिकाणी वनविभागाच्या वतीने पाणवठे तयार करण्यात आले आहे. तसेच सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्याने पाण्याची मोठी समस्या मार्गी लागली आहे. काळविटांचे जंगलातून बाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्याची सोय व गवतासह अन्य प्रकारच्या झाडाझुडपांची लपण संवर्धन क्षेत्रात वाढविण्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी भर दिल्यामुळे काळविटांचा संवर्धन क्षेत्रात मुक्काम वाढीस लागला आहे. या वनसंवर्धन राखीव क्षेत्राच्या परिसरात लांडगा, मोर, तरस, रानडुक्कर यांचेही संवर्धन होत आहे. काळविटांची भटकंती थांबल्याने सुरक्षा बळकट झाली आहे.पाच महिन्यांत दोन हल्ले, एक अपघात ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये पाणवठे व सीमेंटचे बंधारे बांधण्यात आल्यामुळे काळविटांचा जंगलात मुक्काम वाढला आहे. यामुळे दुर्घटनांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. पाण्याच्या शोधात भटकंती करताना कुत्र्यांच्या हल्ल्यात किंवा वाहनांच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी अथवा जखमी होण्याच्या घटना घडत होत्या. या पाच महिन्यांत कुत्र्यांनी काळविटांवर दोनदा हल्ले केले तर एकदा अपघातात काळवीट जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी अपघात व कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या सुमारे दहा ते पंधरा घटना घडल्या होत्या.
ममदापूरच्या जंगलात एक हजार काळवीट
By admin | Published: May 25, 2017 1:25 AM