नाशिक महापालिकेची मासिक महासभा येत्या १९ मे रोजी ऑनलाईन महासभा होणार असून, त्यात हा विषय प्रशासनाने मांडला आहे. महापालिकेत सहा मुख्य सेविका, ३४२ तसेच ३४० मदतनीस आहेत. यातील मुख्य सेविकांना प्रत्येकी ५ हजार ५००, सेविकांना ४६२० रुपये आणि मदतनिसांना ४४०० असे मानधन आहे. या अल्प वेतनातदेखील या सेविका केवळ अंगणवाडीचेच काम नाही, तर महापालिकेचे अनेक प्रकारची सर्वेक्षणे करतात. कोरेाना काळात तर घर सर्वेक्षण करून नागरिकांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचे कामदेखील त्यांना देण्यात आले होेते. आता या सेविकांना मानधनात वाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. प्रत्येकी एक हजार रुपये अशी त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येेणार आहे. या सेविका आणि मदतनिसांच्या मानधनात वाढ केल्याने मासिक ३७ लाख ९७ हजार रुपये इतका खर्च होणार आहे.
दरम्यान, कोरोना काळात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच अंगणवाडी सेविकांचादेखील वैद्यकीय विमा काढण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचा दोन लाख रुपयांचा वैद्यकीय विमा काढण्यात आला आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद होती; परंतु अंगणवाडी सेविकांनादेखील योजनेत समाविष्ट केल्याने एकूण प्रीमियमचा खर्च ५० लाख रुपये होणार आहे. त्यामुळे कार्योत्तर मंजुरीसाठी हा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात आला आहे.