नाशिक : कोरोनाच्या थैमानाने उग्र रूप धारण केलेले असताना शनिवारी जिल्ह्याला १ हजार रेमडेसिविरचा डोस प्राप्त झाला आहे. मात्र, शुक्रवारी केवळ ९२ रेमडेसिविरच मिळाले असल्याने शनिवारच्या साठ्याने शुक्रवारच्या अपेक्षित साठ्याचीदेखील पूर्तता झालेली नाही. त्यामुळे रेमडेसिविरचा मिळालेला साठा हा काहीसा दिलासा असला तरी तो जिल्ह्याच्या मागणीच्या दृष्टीने पुरेसा नाही.
जिल्ह्यात जिथे दररोज पाच हजारांहून अधिक रुग्णांना रेमडेसिविरची गरज असताना, गुरुवारी केवळ ९२ रेमडेसिविरचा पुरवठा झाला. एकेका रुग्णालयालादेखील यापेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शन लागत असताना प्राप्त झालेली इतकी अत्यल्प इंजेक्शन्स म्हणजे गरजू रुग्णांची थट्टाच असल्याचा सूर नागरिकांकडून व्यक्त झाला. दरम्यान, अन्न व औषध विभागाकडे शुक्रवारीच अजून एक हजार रेमडेसिविरचा पुरवठा होण्याची शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत हा पुरवठाच न झाल्याने रुग्णालयांचाही नाइलाज झाला. संकटाचे थैमान सुरू असताना बहुतांश कोविड रुग्णांच्या नातेवाइकांचे लक्ष रेमडेसिविर कधी मिळणार याकडेच नागरिकांचे लक्ष लागलेले होते. त्यामुळे सद्य:स्थितीत शनिवारी प्राप्त झालेला रेमडेसिविरचा पुरवठा काही रुग्णांचा जीव वाचवण्यास उपयुक्त ठरणार आहे. या पुरवठ्यासाठी खासदार डॉ. भारती पवार यांनी गुजरात, कर्नाटक येथील उत्पादकांशी चर्चा करून शेवटी बंगळुरू येथील मायलान कंपनीचे नरेशजी हसिजा यांना विनंती करून नाशिक जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांसाठी उपलब्ध करून दिले, तसेच त्यांनी हसिजा यांचे आभारदेखील मानले. दरम्यान, नाशिकला अजून रेमडेसिविर डोस मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह खासदार डॉ. पवारदेखील अजून पुरवठ्यासाठी पाठपुरावा करीत आहेत.