नाशिक : विडी, तंबाखू, सिगारेटसारख्या अमली पदार्थांचे सेवन तरुणाईमध्ये वाढत्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरत आहे. एका सिगारेटमध्ये चौदा हजारांहून अधिक विषारी रायायनिक घटक असतात, त्यामुळे एकावेळचे धूम्रपान माणसाचे आयुष्य १४ मिनिटांनी घटण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ज्ञ डॉ. नागेश मदनूरकरांचे यांनी केले आहे. गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात नाशिक रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे शनिवारी (दि.२२) प्रोटेस्ट ग्रंथींच्या कॅन्सरवर व्याख्यान देताना ते बोलत होते. नागेश मदूनरकर म्हणाले, तंबाखू सेवन व धूम्रपान यामुळे देशभरात दरवर्षी एक कोटी नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. आज देशातील सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक तरुणाई या दोन्हींच्या आहारी गेली असून, तरुणाईमधील धूम्रपान खऱ्या अर्थाने चिंतेचा विषय बनला आहे. प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला लक्षात येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यावरच हा आजार लक्षात येत असल्याने चाळिशीनंतर नियमित तपासण्या गरजेच्या असल्याचे डॉ. मदनूरकर यांनी सांगितले. दरम्यान, त्वचादानाविषयी जनजागृती करण्यासाठी चित्रफितही दाखविण्यात आली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. यशवंत पाटील, शर्मिला मेहता, जी. एम. जाधव आदी उपस्थित होते. डॉ. कोठारी यांनी सूत्रसंचालन केले.कॅन्सर कुठेही होऊ शकतोऔद्योगिकीकरण व लोकसंख्या यामुळे मुत्राशय व किडनीच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी गेली असून, तब्बल ७० टक्के तरुणांना तंबाखू व सिगारेटच्या व्यसनात गुरफटल्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवत आहे. देशात एकशे तीस कोटींपैकी ४० ते ४५ कोटी लोकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे देशात तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डॉ. नागेश मदनूरकर यांनी सांगितले.
एकावेळच्या धूम्रपानाने १४ मिनिटांनी घटते आयुष्य : नागेश मदनूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:31 AM