नाशिक : गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने आणि पावसाने ओढ दिल्याने अखेरीस महापालिकेने येत्या रविवारपासून (दि ३०) शहरातील ज्या भागात दोनवेळ पाणीपुरवठा सुरू आहे तेथे एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय त्यानंतरही दोन ते तीन दिवस पाऊस होऊन गोदावरी नदीची पातळी वाढली नाही तर गुरुवारी एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून ‘ड्राय डे’ पाळण्यात येणार आहे.महापौर रंजना भानसी आणि आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी यासंदर्भात शुक्रवारी (दि.२८) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरावर घोंगावणाऱ्या जलसंकटातून सुटका करण्यासाठी अखेरीस पाणीकपातीचा कटू निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही त्यातच पावसाने ओढ दिली आहे, अशा स्थितीत पाण्याचा उपसा करणे कठीण होत आहे. महापालिकेने धरणात चर खोदून सखल भागातील दोन मीटर निम्न पातळीवरील पाणी उचलण्याची तयारीदेखील केली आहे. तथापि, सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, नूतन सभागृह नेते सतीशबापू सोनवणे तसेच जगदीश पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्यासह अन्य गटनेते यावेळी उपस्थित होते.शहराला होणाºया पाणीपुरवठ्यात कपात केल्याने गंगापूर धरणातून सध्या उचलले जात असलेल्या १३ दक्षलक्षघनफूट पाण्याऐवजी ते ८ दशलक्षघनफूट इतकेच उचलावे लागेल. त्याऐवजी मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार असून, आता शंभर दशलक्ष लिटर्स पाणी रोज याठिकाणाहूनच घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोड भागासाठी चेहेडी बंधाºयातून शनिवारपासून (दि.२९) पाणी उपसा सुरू होणार असून, त्यामुळे तेथून नाशिकरोड विभागात पाणीपुरवठा होईल. बंधाºयाजवळ भगूर आणि देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मलजल येत असल्याने हे पाणीअत्यंत दूषित असून, २२ मेपासून महापालिकेने बंधाºयातून पाणी उपसा करणे बंद केले आहे. मात्र, गुरुवारी (दि.२७) सायंकाळी जलसंपदा विभागाने दीडशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्याने दूषित पाणी बंधाºयातून वाहून जाणार असून, मग पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करता येईल असे आयुक्त गमे यांनी सांगितले.महापालिकेने केवळ एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णयच घेतला नाही तर सर्व प्रकारचे जलतरण तलाव बंद केले असून, महापालिकेच्या उद्यानात कूपनलिकेद्वारे पाणी दिले जाणार आहे. अर्थात, शहरात पाऊस सुरू झाल्याने पाण्याचा वापर अपवादात्मक स्थितीतच करावा लागणार आहे. याशिवाय खासगी सर्व बांधकामांना महापालिकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार असून, बाटलीबंद किंवा जारमधून पाणीपुरवठा करणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांनादेखील पाणी वापर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरीही शहरातील काही भागांमध्ये तसेच उपनगरांमध्ये काही नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय करतांना दिसत आहे.मुकणे धरणात अत्यल्प साठामहापालिका आयुक्तांनी एकीकडे मुकणे धरणातून जलवाहिनी योजनेतून सध्या ८० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात असताना तो १०० दशलक्ष लिटर्स करण्यात येईल असे जाहीर केले मात्र महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात मुकणे धरणात उपयुक्त जलसाठा अवघा दहा दशलक्षघनफूट इतका दाखविला आहे.४महापालिकेच्या या माहितीमुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मुकणे धरणातून महापालिका दैनंदिन तीन दशलक्षघनफूट इतके पाणी उचलते. त्याचा विचार केला तर मुकणे धरणात तीन दिवस पुरेल इतकाच साठा आहे. त्यामुळे येथून पाणीपुरवठा कसा काय करणार? असा प्रश्न आहे. अर्थात, मुकणे धरणात मृतसाठा अधिक असून, तो जलसंपदा विभाग अधिकृत जाहीर करीत नसल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.एक दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद ठेवल्याने साधारणत: ४६० दशलक्ष लिटर्स पाणी वाचेल अशी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात मात्र ४०० दशलक्ष लिटर्सचा पाणी वाचणार आहे. कारण जलवाहिन्या पूर्णत: कोरड्या झाल्या तर त्या पुन्हा भरण्यासाठी वेळ लागतो आणि दुसºया दिवशीही पाणीपुरवठा विस्कळीत होतो. त्यामुळे यंदा जलवाहिन्यांमध्ये पाणी कायम राहावे यादृष्टीने नियोजन आहे.चार विभागांत होणार एक वेळ पाणीपुरवठामहापालिकेच्या सहा विभागांपैकी सिडको आणि सातपूर या दोन विभागांतच सध्या एकवेळ पाणीपुरवठा होतो. पूर्व नाशिक, पश्चिम नाशिक, पंचवटी आणि नाशिकरोड या चारच विभागांत दोन वेळ पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे या चार विभागांतच एक वेळ पाणीपुरवठा होईल. त्यामुळे ८० दशलक्ष लिटर्स इतक्या दैनंदिन पाण्याची बचत होईल. ज्या भागात पूर्वी एकवेळ पाणीपुरवठा होता. त्या भागात मात्र अन्य कोणतीही कपात नसेल.
उद्यापासून नाशिक शहरात एकवेळ पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:03 AM