ग्रामसेवक दिलीप मोहिते यांनी आशेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, पेसा समिती सदस्यांच्या धनादेशावर खोट्या सह्या करून एप्रिलमध्ये ग्रामनिधी, पेसा निधी, पंधराव्या वित्त आयोगांतर्गंत प्राप्त झालेल्या सुमारे ३७ लाख रुपयांचा अपहार केला आहे. या निधीचे धनादेश मित्रांच्या बँक खात्यावर परस्पर टाकून मोहिते यांनी ही रक्कम स्वत:च्या पदरात पाडून घेत पसार झाले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सविस्तर चौकशी करून आपला अहवाल सादर केला असता, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मोहिते यांना निलंबित केले असून, लवकरच शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी मोहिते यांच्याविरोधात पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारीही सुरू झाली आहे. मात्र या काळात ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होऊ नये म्हणून मोहिते यांच्या जागी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे येथील ग्रामसेवक श्रावण वाघचौरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र वाघचौरे हे इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथे ग्रामसेवक असताना त्यांच्यावर अशाच स्वरूपाचा ग्रामनिधीचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल झालेला असून, त्यात वाघचौरे यांनी मुंबई उच्च न्यायालयातून जामीनही मिळविला आहे. सध्या ते कार्यरत असलेल्या पिंपळनारे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी देखील वाघचौरे यांच्या कामकाजाबाबत यापूर्वीच प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. वाघचौरे यांनी जानेवारी २०२१ मध्ये पिंपळनारे ग्रामपंचायतीची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी त्यांच्याकडे सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीचे दप्तर तपासून ताब्यात देण्यात आलेले असताना, काही दिवसांतच त्यांनी दप्तर गहाळ केल्याची तक्रार सरपंच, उपसरपंचांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे मोहिते गेले, वाघचौरे आले असले तरी, त्यांचेही वळण त्याच मार्गाचे असल्याने आशेवाडीकर संभ्रमात सापडले आहेत.
एकाला झाकले, दुसराही त्याच वळणाचा निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:15 AM