इंदिरानगर : इंदिरानगर बोगद्यातून वन-वे असतानाही नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असले, तरी कॅमेऱ्याच्या आधारे वाहनधारकांवर कारवाई होत नसल्याने कॅमेरे नावालाच उरले असल्याचे दिसते. जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात वन-वे तोडून येणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे होणारी कारवाई मंदावल्याने वाहतुकीवर नियंत्रण नसल्याचे दिसते. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनधारकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खाली जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगदा करण्यात आल्यापासूनच नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. इंदिरानगर परिसरातील शेकडोच्या संख्येने असलेल्या वाहनधारकांना शहरात ये-जा करण्यासाठी हा एकमेव बोगदा असल्याने आणि गोविंदनगरकडून जॉगिंग ट्रॅक मार्गे इंदिरानगरकडे दिवसभर वाहने बोगद्यातून ये-जा करीत असतात. इंदिरानगरकडून जाणाऱ्या वाहनांना प्रवेश आणि गोविंदनगरकडून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला तरीही काही वाहनधारक प्रवेश करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
नो एंट्रीमधून प्रवेश करणाऱ्या वाहनाचा क्रमांक आपोआप स्कॅन करून सीसीटीव्ही फुटेज शहर वाहतूक पोलीस विभागाला तातडीने प्राप्त होते. त्या आधारे संबंधित वाहनधारकाला घरपोहोच दंडाची पावती पाठविली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम मंदावल्याने वाहनधारक नियमांची पायमल्ली करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकदा वाहनांची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे तातडीने नो एंट्रीतून प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.