नाशिक : मानवी मन हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली असून, जो इतरांचे मन जिंकू शकतो तो जग जिंकू शकतो. त्यासाठी मनाचा गढूळपणा दूर करणे आवश्यक आहे. मन आणि शरीराचा प्रबळ संबंध असल्याने मन सुखी तरच शरीरही सुखी अशी स्थिती दिसून येते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. यशवंत पाटील यांनी केले. डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते ‘वेध मनाचा, शोध सुखाचा’ या विषयावर बोलत होते. या मंडळाचे ज्येष्ठ सभासद डी. एस. पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अनंत साळी, उपाध्यक्ष रघुनाथ पुरी आदि उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, प्रत्येक वयात मनाचा वेध, अवस्था ही वयानुसार बदलते. मात्र या बदलत्या वयात व परिस्थितीत मनावर संयम ठेवणे आवश्यक आहे. सकारात्मक भाव ठेवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
ज्याने मन जिंकले, त्यानेच जग जिंकले
By admin | Published: December 21, 2014 12:46 AM