नाशिक : चोरीची दुचाकी खरेदी करणे त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडी येथील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आला असून, चाेरट्यांकडून चाेरीची दुचाकी खरेदी केली, म्हणू्न न्यायालयाने संबंधित तरुणाला एक वर्षांचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय विजय बेंडकुळे (२२ रा.हनुमान मंदिराजवळ, पेगलवाडी, त्रंबकेश्वर, नाशिक) असे न्यायालयाने शिक्षण सुनावलेल्या आराेपीचे नाव आहे.
गंगापूर राेडवरील ध्रुुवनगर येथील वीरा अव्हेन्यू साेसायटीतून १० ते ११ ऑगस्ट, २०१९ दरम्यान आराेपी मंगेश संजय मधे (२० रा.पिंपळगाव बहुला सातपूर) व प्रदीप जगन्नाथ तुपे (फरार) यांनी संदीप सारंगधर वरखेडे यांची दुचाकी चोरून नेली हाेती. ती मोटारसायकल दाेघांनी अक्षय बेंडकुळे याला खोटे सांगून विक्री केली. या प्रकरणात बेंडकुळे याने चोरीच्या वाहनाचे कागदपत्र व इतर बाबींची खात्री न करता, दाेघांकडून दुचाकी विकत घेतल्याने, या प्रकरणात त्याच्याविरोधातही पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.एम. गादीया यांनी बेंडकुळेला एक वर्षाचा सश्रम कारावास व दंड, तसेच दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.