कांदा चोरांचा पर्दाफाश करण्यात देवळा पोलिसांना यश मिळाले, संशयीत आरोपींसमवेत पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील, निलेश सावकार, श्रीमती ज्योती गोसावी, सचिन भामरे आदी पोलिस कर्मचारी.
देवळा : तालुक्यात दोन आठवड्यांपासून शेतात काढुन ठेवलेल्या कांद्यांची चोरी करणाºया चोरट्यांना पकडण्यात अखेर देवळा पोलिसांना यश आले.याबाबत देवळा पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी, दि. ६ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास देवळा तालुक्यातील वरवंडी येथील शेतकरी समाधान पांडुरंग शिंदे यांच्या शेतातील सुमारे २० ते २५ क्विंटल कांदे चोरीस गेले होते. याप्रकरणी शिंदे यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला होता. यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसात पुन्हा मटाणे येथील उपसरपंच भाऊसाहेब अहेर यांच्या शेतातील २० ते २५ क्विंटल कांदे चोरीस गेले. दरम्यान चांदवड तालुक्यातील भुताणे येथील काही युवक पीकअप या वाहनाच्या सहाय्याने देवळा तालुक्यात कांदे चोरी करतात. अशी माहिती पोलीसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल निलेश सावकार, सचिन भामरे, सुनिल गांगुर्डे, आदिंनी भुताणे येथे जावून शोध घेतला असता संशयीत आरोपी सतीश उर्फ गणेश बारकु शिंदे हा त्याची सासुरवाडी जयदर (ता. कळवण) येथे गेल्याचे समजले. त्याचा जयदर येथे जावून शोध घेतला असता तो गणोरे येथे गेल्याचे समजल्याने पोलिसांनी तात्काळ गणोरे येथे जावून त्यास ताब्यात घेतले. त्याचा साथीदार परशराम तात्या मोरे ( रा.शेलू ता. चांदवड)यास शेलू येथुन ताब्यात घेतले. तिसरा संशयीत आरोपी अल्पवयीन असल्याने त्यास अद्याप ताब्यात घेतले नाही. सदर संशयीत आरोपिंना दि.१६ रोजी अटक करु न कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना २० पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. सदर संशयीत आरोपिंनी देवळा, चांदवड व कळवण तालुक्यातील इतर ठिकाणीही कांदे चोरी केल्याचे समजते.