लासलगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच मार्च एण्डच्या कामामुळे लासलगावसह जिल्ह्यातील कांदा बाजारपेठेत शुक्रवारपासून (दि.२७) लिलाव बंद झाल्याने, दररोज किमान दोन तर तीन करोड रुपयांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. सलग तीन ते चार दिवस लिलाव बंद असल्याने, करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी, हमाल, ट्रक चालक-मालक व व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. धुळवड सणामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व शेतीमालाच्या लिलाव बंद राहिल्याने अर्थकारण ठप्प झाले आहे. सुमारे दीड ते दोन लाख क्विंटल विक्री होणाऱ्या या शेतीमालाचे लिलाव बंद राहिले. त्यामुळे वीस कोटींचा फटका बसला असून, विविध व्यवसाय ठप्प झाले आहेत. सलग लिलाव बंदमुळे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर व्यापारी हमाल, मापारी, ट्रक मालक, चालक, मालक व्यावसायिकांच्या दुकानाचे व्यवहार ठप्प होणार आहेत. लासलगाव ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागांत जिल्ह्यातून कांदा निर्यात होत असो, एकट्या लासलगाव बाजार समितीत दिवसाला कांद्याची सुमारे ३० ते ३५ हजार क्विंटल आवक होते, तर पिंपळगाव, नाशिक, दिंडोरी, कळवण विविध बाजार समित्यांमध्ये प्रतिदिन एकूण दोन लाख हजार क्विंटल कांदा आवक होते. मात्र, उद्या व परवा सलग दोन दिवस जिल्ह्यातील कांद्याबरोबरच शेतीमालाचे लिलाव बंद असल्याने, कांदा पिकासह भाजीपाला याची प्रथमच कोंडी होत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेर केले जाणारे ऑडिट, बँकांचे बंद असणारे व्यवहार अशी करणे देत, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दि. ४ एप्रिलपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी या बाजार समित्या ८ ते १० दिवस बंद राहणार आहेत. ऐन कांदा काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज बंद राहणार असल्याने, शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करण्यात अडचणी येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद, तर पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आले होते.