नाशिक : प्राप्तिकर खात्याच्या विविध पथकांकडून लासलगावसह पिंपळगाव बसंवत येथील कांदा व्यापाऱ्यांकडील व्यवहाराची तपासणी गुरूवारी (दि.१५) सलग दुसºया दिवशीही सुरू राहिल्याने व व्यापारी वर्ग लिलावात सहभागी न झाल्याने लासलगाव येथील कांदा लिलाव बंद राहिले. पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत लिलाव होऊन कांदा दरात ४८० रुपयांनी घसरण झाली तर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांतही तीच स्थिती दिसून आली. दरम्यान, या कारवाईमुळे दर कमी होण्याची भिती शेतकºयांमध्ये निर्माण झाल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.बुधवारी (दि.१४) प्राप्तिकर विभागाकडून लासलगाव येथील १० तर पिंपळगाव बसवंत येथील एका व्यापाºयाच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी सुरू करण्यात आल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली होती. सलग दुसºया दिवशीही ही तपासणी सुरूच राहिल्याने कांदा व्यापाºयांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय बाजार समितीला कळविला. त्यामुळे समिती आवारात विक्रीसाठी आणलेला कांदा शेतकºयांना परत माघारी घेऊन जावा लागला. लासलगाव बाजार समितीने काही कांद्याची वाहने विंचुर येथील कांदा उपआवारावर विक्र ीस नेण्याचे आवाहन केले. प्राप्तिकर विभागाच्या तपासणीमुळे कांदा लिलाव बंद राहिल्याने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना तसेच शेतकरी संघर्ष समितीसह शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाने तपासणी सुरू केल्याने कांदा लिलाव ठप्प झाले आहे . कांदा विभागातील व्यापारी वर्गाने दैनंदिन कामकाजात सहभागी होऊ शकणार नसल्याचे बाजार समितीस कळविल्याने लिलावाचे कामकाज बंद ठेवावे लागले. लवकरच बाजार समिती प्रशासन व कांदा व्यापाºयांमध्ये बैठक घेऊन हे लिलाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे थेट परिणाम हा कांद्याचा बाजार भावावर होतो. कांदा उत्पादकांना याचा थेट फटका बसत असल्याने याबाबत केंद्र सरकारजवळ पाठपुरावा केला जाणार आहे.- सुवर्णाताई जगताप, सभापती ,लासलगाव बाजार समिती