उमराणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाउन काळात होत असलेली गर्दी बघता गेल्या अकरा दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेल्या उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव सोमवारी (दि.२०) पुन्हा सुरू करण्यात आले. परंतु हे लिलाव थेट त्या-त्या कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यातच होत असल्याने कांद्याला मिळणाºया दराबाबत शेतकरीवर्गात साशंकता व्यक्त केली जात आहे. शासनाने खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पंधरा दिवसांपूर्वी शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील बाजार समित्यांचे व्यवहार सुरू करण्यात आले होते. मात्र सुरू होऊन दोन-तीन दिवस होत नाहीत तोच मालेगावसह अन्य ठिकाणी कोरोनाचे रु ग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.परिणामी स्थानिक नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी उमराणे बाजार समिती प्रशासनाला व्यवहार बंद ठेवण्याचे लेखी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने जवळपास अकरा दिवस बाजार समितीचे कामकाज बंद होते.या काळात शेतक-यांच्या शेतातील काढणी झालेल्या कांदा मालाचे होत असलेले नुकसान बघता खासदार डॉ. भारती पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्ह्यातील बाजार समित्यांचे सभापती यांची बैठक होऊन नवीन नियमावलीनुसार जिल्ह्यातील बाजार समित्या सोमवारपासून (दि. २०) सुरू झाल्या आहेत.
कांद्याचे लिलाव; पण खळ्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:05 PM
उमराणे : बाजार समितीत खुले लिलाव सुरू करण्याची मागणी
ठळक मुद्देजवळपास अकरा दिवस बाजार समितीचे कामकाज बंद होते.