कांद्याची प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा सरासरी एक हजार तर उन्हाळ कांदा सरकारी ११०० रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहे. मिळणाऱ्या दरातून खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्गाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. काही आठवड्यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जबरदस्त फटका शेतमालाला बसल्याने उत्पादनात घट झाली. त्यात आता शेतकऱ्यांना दरातील घसरणीचा सामना करावा लागत आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि कोलकाता या राज्यात नवीन कांदा विक्रीस येत आहे. त्यामुळे या राज्यातून कांद्याची मागणी कमी झाल्याने मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत येत आहे. परिणामी, कांदा हजार-अकराशे रुपयांवर विकण्याची वेळ आली आहे.
येथील मुख्य बाजार आवारावर लाल कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल १२८१ तर सरासरी ११८० तर उन्हाळ कांद्याला किमान ६०० रुपये, सरासरी १३२० तर कमाल १५३५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
इन्फोसोशल मीडियावर बंदची चर्चा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मागील सप्ताहात बंद असलेले शेतीमालाचे लिलाव सोमवारी सुरू करण्यात आले; परंतु कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा, धान्य व भाजीपाला या शेतीमालाचे लिलाव २७ एप्रिल ते २ मे या कालावधीत बंद राहणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत बाजार समितीकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध झालेले नाही. दरम्यान, पालकमंत्री भुजबळ यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रसंगी बाजार समित्या आठ दिवस बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे त्याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.