शेखर देसाई
लासलगाव (जि. नाशिक) : गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले येथील बाजार समितीतील कांदा लिलाव उद्या (दि. २४) पासून पूर्ववत सुरू होतील अशी माहिती लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गणेश डोमाडे ,संचालक मंडळ व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी आज बाजार समितीमध्ये सकाळी साडेदहा वाजेपासून व्यापारी वर्गाची दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर उद्यापासून लासलगाव बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू होणार आहेत. संचालक बाळासाहेब दराडे प्रवीण कदम ,रमेश पालवे, ओम प्रकाश राका ,मनोज जैन,नितीन जैन उपस्थित होते.
लासलगावी आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. बाजार समितीच्या लिलावात जे भाव जाहीर होतात त्यावरच राज्यात देशात आणि परदेशी देखील बाजार भाव घोषित होत असतात. त्यामुळे अन्य बाजार समितीच्या तुलनेमध्ये लासलगाव बाजार समितीतील कांदा लिलाव सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे होते. काल सभापती बाळासाहेब शिरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केली होती.बाजार समिती कांदा लिलाव उद्या सुरू होणार असले तरी विंचूर बाजार समितीचे व्यवहार झालेले आहेत. उद्यापासून शेतकरी वर्गाने आपला कांदा शेतीमाल विक्री असे शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना असे आवाहन करण्यात आले आहे.
‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
दरम्यान, महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी शासनाने कांदा निर्यातीवर ४०टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतांना शेतकरी व व्यापारी यांना कुठलीही वेळ न दिल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याबाबत निर्णय घेतला. बाजार समित्यांमधील कांदा शेतमाल लिलाव व इतर शेतीमालाचे लिलाव सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. आवश्यकता असल्यास महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ व त्याखालील नियम, १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीने अशा व्यापाऱ्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करावी असे बाजार समित्यांस निर्देशित करावे असे बाजार समितीस आदेश दिले होेते.