वणी : साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्यात घट, लाल कांद्याची आवक लांबणीवर व परराज्यातील कांदा बाजारात येण्याची प्रतीक्षा याचा एकत्रित परिणाम म्हणजे कांदा भाव तेजीत आहे. भावात अजून वाढ होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. वणी उपबाजारात ५ हजार क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. १९४ वाहनांतून देवळा, कळवण, चांदवड, दिंडोरी आदी तालुक्यांतून उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी आणला होता. कमाल १५१८, किमान १ हजार, तर सरासरी १२३५ रु पये प्रतिक्विंटल याप्रमाणे कांद्याला भाव मिळाला. कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे. साठवणूक केलेला उन्हाळा कांद्यापैकी वीस टक्के कांदा खराब झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा साठवणूक केलेल्या कांद्याचे प्रमाण टक्केवारीनुसार कमी झाले आहे. लाल कांद्याच्या लागवडीला परतीच्या पावसाने साथ दिली नसल्याने लाल कांद्याच्या उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित लाल कांदा पंधरा दिवसांनंतर बाजारात विक्र ीसाठी येईल. त्याबरोबर प्रतिवर्षीच्या स्थितीप्रमाणे राजस्थानमधील कांदा यावेळी विक्र ीसाठी बाजारात येतो व मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत विक्र ीसाठी कांदा उपलब्ध होतो. मात्र तेथील कांदा नैसर्गिक कारणांमुळे किमान वीस दिवसांनंतर बाजारात येणार आहे. त्यामुळे वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कांद्याचा पर्याय आहे. कांद्याची मागणी वाढली असून, सध्या तरी तेजीचे वातावरण राहणार असल्याची माहिती कांदा व्यापारी मनीष बोरा यांनी दिली. दरम्यान, कांदा भावातील तेजी उत्पादकांचा आनंद वाढविणारी असून उत्पादकांमधून अनुकूल प्रतिक्रि या उमटत आहेत.
कांदा तेजीत; उत्पादकांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 5:50 PM