शेखर देसाई, लासलगाव (जि. नाशिक): कांद्यावरील निर्यात शुल्क वाढवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सरकारकडून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने कांद्याची खरेदी केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत म्हटले की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
२४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याने निर्यातशुल्काचा सर्वाधिक फटका राज्यालाच बसणार आहे. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत.