नाशिक : ‘लेव्ही’च्या मुद्यावरून लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्व १४ बाजार समित्यांतील व्यवहार सोमवारी थंडावले. कामगार उपायुक्तांनी तातडीने व्यापारी व माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली. मात्र व्यापारी संघटनेचे पदाधिकारी न आल्याने बैठक होऊ शकली नाही. मंगळवारी बैठक घेऊन कोंडी फोडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील कांदा बाजारपेठेत येत असल्याने तूर्तास कांदा महागण्याची कोणतीही शक्यता नाही. माथाडी कामगारांच्या लेव्हीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर हमाली आणि तोलाईचे दरही वाढविण्यात आले आहे. सोमवारपासून हे दर अंमलात येणार होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलावच न करण्याचा निर्णय घेतला. सध्याचा उन्हाळ कांदा दीर्घकाळ टिकणारा असल्यामुळे त्याची साठवण करणे शेतकऱ्यांना शक्य असले तरी गारपिटीने काही प्रमाणात कांद्यास फटकाही बसलेला आहे. त्यातच खरीप हंगामातील इतर पिकांच्या लागवडीसाठी हातात पैसा नसलेल्या शेतकऱ्यांचे, लिलावाअभावी अर्थकारणच डळमळीत होणार आहे. कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी परगावी गेल्याने बैठक होऊ शकली नाही, असे कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)