चांदवड (महेश गुजराथी) : दुष्काळी तालुका असल्याने खरीप हंगाम हाच प्रमुख हंगाम असल्याने कांदा पीक हेच प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तालुक्यात कांदा पिकाची सर्वसाधारण दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केली जाते. दुष्काळी तालुका असूनही गेल्या चार-पाच वर्षांमध्ये सर्व शासकीय यंत्रणांकडून मृद व जलसंधारणाच्या झालेल्या कामांमुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे फक्त पोळ कांद्याचे उत्पादन न होता त्यात लेट खरीप, रब्बी व काही प्रमाणात उन्हाळी हंगामामध्येसुद्धा कांदा पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. कांदा पिकाला हमीभाव नसल्याने बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना तोट्याची शेती करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी कांदा पिकाला साधारणपणे १८ हजारपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र कांद्याचे दर कोसळतच आहेत. तालुक्यातील उत्पादित कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, मनमाड, चांदवड, उमराणे व पिंपळगाव बसवंत, वाशी येथे विक्रीसाठी नेला जातो. तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत व स्वखर्चाने कांदाचाळी उभारल्या आहेत. उन्हाळी हंगामातील कांदा पीक चाळीमध्ये साठवला जातो.
-----------------------
प्रक्रिया उद्योग केंद्र नाही
सद्य:स्थितीमध्ये उन्हाळी कांदा पिकाला १३०० ते १४०० इतका सरसरी भाव आहे, तसेच मका पिकाचे १८५९० हेक्टर व सोयाबीन या पिकाचे ११३१६ हेक्टर इतके क्षेत्र आहे. कृषी विभागामार्फत मका व सोयाबीन या पिकांचे कीड-रोग व सल्ला प्रकल्पअंतर्गत नियमित निरीक्षणे नोंदवून आर्थिक नुकसान पातळीबाबत सल्ला दिला जात आहे. तालुक्यात एकूण १३६६० शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला असून, त्यात प्रामुख्याने मका ६०९०, सोयाबीन ५१०७ व कांदा १२९१ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. तालुक्यात कांदा पिकाचे विक्रमी उत्पादन होऊनही कांद्यावरील प्रक्रिया उद्योग केंद्र अस्तित्वात नाही. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले आहे. भविष्यात कांदा पिकावरील प्रक्रिया उद्योग स्थापन होऊन शेतकरी बांधवांना उत्पादित कांदा पिकाला हमीभाव मिळेल व आर्थिक जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा आहे.
-----------------------
चांदवड तालुक्यात कांदा हे नगदी पीक असून, मका व सोयाबीन या पिकांचेही विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्यासाठी तालुक्यातील अस्तित्वात असलेले प्रक्रिया उद्योग व कांदा पिकावरील नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेंतर्गत इच्छुक शेतकरी बांधवांचे प्रकल्प संचालक (आत्मा)यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले आहे, तसेच सद्य:स्थितीमध्ये तालुक्यात अस्तित्वात असलेल्या प्रक्रिया उद्योजकांबरोबर शेतकऱ्यांचे करार करून शाश्वत हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-विलास सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, चांदवड
(११ चांदवड खबरबात), (११ विलास सोनवणे)
110921\11nsk_4_11092021_13.jpg
१० चांदवड खबरबात