येवला : येवला व अंदरसूल बाजार समिती आवारात बुधवारी लाल कांद्याची १८ हजार क्विंटल आवक झाली. गेल्या दोन दिवसांत ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव घसरल्याने शेतकरी आपल्या शेतातील लाल कांदा विरळून काढत असून, मिळत असलेला भाव पदरात पडून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहे.येवला बाजार समितीच्या येवला व अंदरसूल उपबाजारात बुधवारी साठवणीच्या उन्हाळ कांद्यासह नवीन लाल कांद्याची आवक १८ हजार क्विंटल झाली. गेल्या आठ दिवसांपूर्वी कांद्याला ४४४४ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. १५ डिसेंबरनंतर लाल कांदा बाजारात येईल, असा अंदाज असताना अंतिम टप्प्यात साठवणीचा उन्हाळ कांदा आणि नव्याने येऊ घातलेला लाल कांदा अशा दोन्ही कांद्यांना भाव तेजीत राहतील, असा जाणकारांचा अंदाज होता. शेतकरी आनंदात असताना अपेक्षेपेक्षा १५ दिवस अगोदर लाल कांदा बाजारात दाखल झाला. आणि भावात घसरण झाली. आणखी कांद्याचे भाव कमी होतील.चालू असलेला भाव पदरात पडून घ्यावा या आशेने शेतकरी शेतातून विरळून कांदा काढण्याच्या तयारीला लागला; शिवाय कमी-अधिक कच्चापक्का कांदादेखील शेतकरी बाजारात आणू लागल्याने मोठ्या प्रमाणावर आवक वाढली. त्याचा परिणाम भाव कमी होण्यावर झाला. १५ नोव्हेंबरला लाल कांद्याने मार्केटमध्ये प्रवेश केला आणि अवघ्या आठ दिवसात मार्केटमधील एकूण कांदा आवकेत ८० टक्के लाल कांदा येऊ लागला आहे. बुधवारी येवला मार्केटमध्ये ९५ टक्के लाल कांदा दिसत होता.येवला व अंदरसूल बाजार आवारात ८०० ट्रॅक्टर आणि १०० रिक्षा पिकअपमधून सुमारे १८ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. येवला बाजार आवारात नवीन लाल कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल २९७५ तर सरसरी २७०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ही भावातील लक्षणीय घट आहे. अल्पप्रमाणात आवक असलेल्या उन्हाळ कांद्याला किमान १६०१ रु पये भाव मिळाला.