मार्च अखेरमुळे मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे लिलाव बंद होते. सोमवारी बाजार समित्यांचे काम पूर्ववत सुरू झाले. गेल्या आठ दिवसांपासून शेतीमाल विक्रीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी पहिल्याच दिवशी बाजार समित्यांमध्ये गर्दी केल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली.त्याचा कांदा दरावर परिणाम झाला. सोमवारी लासलगाव बाजार समितीत दुपारपर्यंत १६०० वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. येथे लाल कांद्याला कमीत कमी ५०० तर अधिकाधिक ९४० व सरासरी ८५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.गेल्या शनिवारच्या तुलनेत लाल कांद्याच्या दरात सुमारे २०० रुपयांची घसरण झाली. उन्हाळ कांद्याच्याही सरासरी दरात ५० ते १०० रुपयांनी घसरण झाली. सोमवारी उन्हाळ कांद्याला अथिकाधिक ११७२ रुपये तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नांदगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी ६२५ तर उन्हाळ कांद्याला सरासरी ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
पहिल्याच दिवशी कांदा दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनच्या शक्यतेने अनेक शेतकऱ्यांचा कांदा विक्रीकडे कल वाढल्याने बाजार आवक वाढली आहे. कडक निर्बंधांमध्येही शेतीची कामे सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्यवेळी कांदा विक्रीचा निर्णय घ्यावा असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.