गत आठवड्यापासून परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच सायंकाळी व रात्री उशिराने पावसाने हजेरी लावली होती. दोन दिवसांपासून हवेत कमालीचा उकाडा असून, सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन नांदूरशिंगोटे परिसरातील गावांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन होते. अचानक आलेल्या पावसाने बळीराजाची काढलेला शेतीमाल झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. पण, शेतात उभे असलेले पीक आणि ठिकठिकाणी सध्या कांद्याच्या पिकाची काढणी सुरू आहे. अशातच अचानक पाऊस सुरू झाल्याने तीन ते चार महिने सांभाळ केलेली पिके डोळ्यादेखत ओली झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आता कांदा पिकाची प्रतवारी घसरणार असून, उत्पादन खर्चही निघणे मुश्कील होणार आहे. कोरोना महामारी सुरू असल्याने कांद्याला मागणी घटली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात कमालीची दररोज घसरण होत आहे. त्यामुळे कुटुंब चालवावे कसे, असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
इन्फो....
अवकाळी पाऊस ठरतोय डोकेदुखी
पाच ते सहा दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शेतात सध्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा काढून पडला आहे. बाजार नसल्याने शेतकऱ्यांची कांदा चाळीत साठवून ठेवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. काही शेतकरी काढलेला कांदा शेतातच साठवून ठेवत आहेत, तर काहींचा कांदा अद्याप शेतातून बाहेर पडणे बाकी आहे. परंतु, दररोज येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाणादाण उडाली आहे.