दिंडोरी : केंद्र शासनाची धोरणे शेतकरी विरोधी असल्याचे सांगून मोदी सरकारने कांदा उत्पादकांची पुरती वाट लावली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केली.दिंडोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पाकिस्तान सीमेवर गोळीबार होत असून, सीमेवरील नागरिकांना निर्वासित व्हावे लागत आहे, मात्र पंतप्रधान ठोस निर्णय घेण्याऐवजी सभा घेत आहेत. हेच का ते अच्छे दिन? असा सवाल पवार यांनी केला. आपण सीमेवर कधी गेलो होते का? या पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार यांनी आपण रक्षामंत्री असताना जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सियाचीनसह सर्व सीमेवर गेलो होतो, असेही सांगितले. कांदा जीवनावश्यक यादीत टाकल्यामुळे चांगला भाव मिळत नाही. टमाट्यालाही काही देशांच्या सीमाबंद केल्याने यंदा टमाट्याचे उत्पादन कमी होऊनही भाव कोसळले आहे. कापूसही आयात केल्याने कापसाचे भावही कोसळले. साखरेचे अनुदान कमी केल्याने उसाचे भावही कमी होणार आहे. यास केंद्राचे धोरण जबाबदार आहे. आता द्राक्ष निर्यातीबाबतही असेच धोरण राहणार असल्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. यावेळी नरहरी झिरवाळ, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, डॉ. योगेश गोसावी आदि उपस्थित होते.
कांदा उत्पादकांची पुरती वाट लावली
By admin | Published: October 10, 2014 11:25 PM