लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर व निफाड तालुक्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असलेला नायगाव ते सिन्नर हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने व संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाल्याने तसेच रस्त्यांच्या साईडपट्ट्यांना मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसह त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सिन्नर तालुक्यातील उत्तर भागातील नायगाव, जोगलटेंभी, सोनिगरी, ब्राह्मणवाडे, वडझीरे, देशवंडी, जायगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर वा पिकअप या वाहनांमधून घेऊन जावा लागतो. या भागातील नागरिकांनाही सिन्नरकडे ये-जा करताना खराब रस्त्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता अरुंद असल्याने व त्यावरील रहदारी वाढल्याने गेल्या काही महिन्यांत अनेकांना अपघातात नाहक प्राण गमवावे लागले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याने सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांची तसेच एकलहरे येथील औष्णिक वीज केंद्रातून राखेची वाहतूक करणाऱ्या काही अवजड वाहनांची नियमित वाहतूक सुरु असते. नाशिक जिल्ह्यातील निफाड व नाशिक सहकारी साखर कारखाने बंद असल्याने या भागातील ऊस उत्पादकांचा ऊस नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना पोहोचविण्यासाठी याच रस्त्याचा वापर होत आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ रुंदीकरणासह दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तहसीलदार राहुल कोताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, जायगावचे माजी उपसरपंच कैलास गीते, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतुल गीते तसेच सुभाष दिघोळे, रामराव दिघोळे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
तहसीलदार राहुल कोताडे यांना भारत दिघोळे यांनी निवेदन दिले. यावेळी अतुल गीते, सुभाष दिघोळे, कैलास गीते, रामराव दिघोळे, आदी उपस्थित होते. (१९ सिन्नर १)
===Photopath===
190321\19nsk_10_19032021_13.jpg
===Caption===
१९ सिन्नर १