नामपूर : यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्पच राहिले असून, विहिरींना पाणीच उतरले नाही. गत दोन वर्षांपासून बळीराजा संकटात आहे. यंदा संकट अधिकच गडद होण्याची शक्यता आहे. कांद्याला खराब हवामानाने जेरीस आणले. दोघ पिकांना गेल्या वर्षी व यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. तेल्या, मर, प्लेग या रोगांमुळे डाळींब पीक पुरते नामशेष झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतातून डाळींब पिकाची झाडे मुळापासून उपटून फेकून दिली आहेत. ज्या पिकांनी शेतकऱ्यांना अल्पावधीत दोन पैसे मिळवून दिलेत. ते पीक ते झाड तोडताना शेतकऱ्याला वेदना झाल्या.यंदा डाळिंबाला व कांद्याला रोगग्रस्त तर केलेच मात्र भावही खूपच कमी झाले. दोन वर्षांपूर्वी डाळिंबाला १५० ते १५ किलोप्रमाणे भाव होता. यंदा मात्र ५० ते ६५ रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. कांद्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. गेल्या एक दोन वर्षांपूर्वी कांद्याला ५ ते ६ हजारांपर्यंत प्रतिक्विंटल भाव होता. यंदा तीन रुपये किलोपासून १५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव होता. शेतकऱ्यांना हा भाव न परवडणारा आहे. गेल्या वर्षी कर्जात वाढ झाली. यंदाच्या वर्षी कमी भाव, निसर्गाचा फटका यामुळे शेतकरी पुन्हा कर्जात बुडणार आहे. बेभरवशाचे पीक मोसम पट्ट्यात करोडे रुपयाचे डाळींब पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. डाळींब हे भरपूर पैसा देणारे पीक आहे. डाळींब पिकाने अनेक शेतकऱ्यांना करोडपती बनवले. मात्र हेच डाळींब पीक आता तेल्या व मर रोगाच्या दृष्टचक्रात सापडले आहे. जिल्ह्याला डाळींब पिकाचा प्रारंभ दाभाडी, पिंपळगाव या मालेगाव तालुक्यातील गावांनी केला. सुरुवातीला येथे डाळींब पिकाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात दिला; मात्र या भागात तेल्या व मर रोगाने प्रादुर्भाव केला. उत्कृष्ट डाळींब बागा नामशेष करून या भागातून डाळींब पीक आता जवळजवळ ७५ टक्के हद्दपार झाले आहे. तशीच काहीसी अवस्था आता नामपूर भागातील काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. डाळिंबाला तसे औषधे व मेहनतसुद्धा मोठ्या प्रमाणावर लागते. मात्र तेल्या व मर रोगाला कोणतेही औषध कामात येत नाही. तेल्या रोगात डाळिंबाची फळे खराब होतात, तर मर रोगात झाडच मरून जाते. फळे खराब होऊन संपूर्ण बागच उद्ध्वस्त होते. म्हणून डाळींब पीकही बेभरवशाचेच पीक आहे. मोसम पट्ट्यात डाळींब बागांचे क्षेत्र जवळ जवळ ६० टक्के आहे. मोसम पट्ट्यातला डाळींब हा चवीला गोड असल्याने त्याला परदेशातूनही वाढती मागणी असते. साहजिकच डाळींब खरेदी करणारा व्यापारीसुद्धा या भागातील डाळिंबाला इतर डाळिंबाच्या तुलनेत जास्तीचा भाव देताना दिसतात.मोसम पट्ट्यात कोथिंबीर व टमाट्याचेही उत्पन्न घेतले जाते. कोथिंबीर ही अत्यंत कमी कालावधीत येणारे पीक आहे. या पिकाने एक दोन महिन्यात अनेक शेतकऱ्यांना भरपूर पैसा मिळवून दिला आहे. प्रसंगी कोथिंबिरीचे पीक एकतर लूट भावात द्यावे लागते अन्यथा पिके गुरांना घालावे लागतात. अशीच अवस्था टमाटा पिकाचीसुद्धा आहे. मोसम पट्ट्यात टमाट्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा टमाट्याचे उत्पादन भरपूर झाले. मात्र भाव अजिबातही नव्हता. शेतकऱ्यांना टमाटा रस्त्यावर फेकावा लागला गुरांना घालावा लागला. बिकट अवस्था असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)
कांदा, डाळींब पिकाने आणले डोळ्यात पाणी
By admin | Published: October 30, 2014 10:43 PM