लोहोणेर : आज ना उद्या भाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत सांभाळून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची आयुष्य मर्यादा संपत आल्याने या कांद्याला कोंब फुटले आहेत. तर काही ठिकाणी या कांद्यानी पाणी सोडण्यास सुरुवात केली असून, यामुळे चाळीतील कांदा आता शेतकरीवर्गाने बाहेर फेकण्यास सुरुवात केली आहे. कसमादे पट्ट्यातील कळवण, देवळा या तालुक्यात हे चित्र सर्वत्र दिसत आहे.उन्हाळी कांद्याची सर्वसाधारण पणे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लागण केली जाते. सदर कांदा हा साधारण चार महिन्यांनंतर काढला जातो. उन्हाळ कांदा हा नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या पिकावरच शेतकºयांचे आर्थिक गणित अवलंबून असते. दीपावलीच्या आधी शेतकरी हा कांदा विक्रीसाठी चाळणीतून बाहेर काढीत असतो; मात्र यावर्षी योग्य भाव न मिळाल्याने यावेळी शेतकºयांनी उशिरा कांदा विक्रीसाठी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला; मात्र यावर्षी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने वर्षाचा कालावधी उलटत आला तरी भाव मिळत नसल्याने कांदा चाळीत सडत पडला आहे. या कांद्याची आयुष्य मर्यादा संपत आली त्यामुळे या कांद्याला आता चाळीतच कोंब फुटले असून काही ठिकाणी तर कांदा खराब झाल्यामुळे कांद्याच्या चाळीतून पाणी बाहेर पडत आहे. यामुळे हा खराब कांदा बाहेर फेकण्याची वेळ आता या शेतकºयांवर आली आहे.
आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल या आशेने चाळीत कांदा सांभाळून ठेवला; मात्र या कांद्याला आता कोंब फुटले असून, सदर कांदे आता बाहेर फेकण्याची वेळ आली आहे.- सुनील देवरे,कांदा उत्पादक शेतकरी.