नाशिक : ज्या काळात कांदा ७० ते ३०० रुपये क्विंटलने विकला जात होता, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते, त्या काळात कुणीही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले नाहीत आणि आज चार वर्षांनंतर कांद्याला बरे दिवस आले तर केंद्रीय पथक लगेचच कांदा भाववाढीचे कारण शोधण्यासाठी बाजार समित्यांमध्ये दाखल झाले हा विरोधाभास का, असा संतप्त सवाल नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.
मागील सप्ताहाच्या तुलनेत या सप्ताहात कांदा भाव उतरले असले तरी, शेतक-यांनी घाबरून न जाता टप्प्याटप्प्याने प्रतवारी करून कांदा विक्रीसाठी आणावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, देवळा, कळवण, सटाणा आदी सर्वच बाजार समित्यांमध्ये गेल्या आठवड्यात कांद्याला ४८०० ते ५१०० रुपयांचा उंच्चाकी भाव मिळाला होता. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे या आठवड्यात भाव ७०० ते १००० रुपयांनी कमी होऊन ३९०० ते ४००० पर्यंत आले आहेत. यामुळे शेतक-यांचे एका ट्रॉलीमागे साधारणत: २० ते २२ हजारांचे नुकसान होत आहे.
देशांतर्गत मागणी वाढलेली असल्याने मागील आठवड्यात बाजार समित्यांमध्ये कांद्याला ५१०० रुपयांपर्यंत उंच्चाकी भाव मिळाला. मात्र याचा फायदा मोजक्याच शेतक-यांना झाला. भाववाढ झाल्याने केंद्रीय पथकाने भाववाढीची कारणे शोधण्यासाठी बाजार समित्यांना भेटी दिल्या. त्याचबरोबर नाफेडचा कांंदा विक्र ीस आणला गेला. इतकेच नव्हे तर कांंद्याच्या साठेबाजीवर धोरण ठरविण्यासाठी पावले उचलली गेली. या सर्वांचा एकत्रित परिणाम या आठवड्यात बाजार समित्यांमध्ये दिसून आला आहे. सरासरी ४२०० ते४५००रुपयांपर्यंत जाणारा कांदा ३५०० ते ३८०० रुपयांवर येऊन ठेपला. भाव कमी झाल्याने शेतक-यांना प्रतिक्विंटल ७०० ते १००० रुपयांचा फटका बसला आहे.कांदा भावात झालेल्या वाढीने शहरी भागातील ग्राहकाला कमी भावात कांदा उपलब्ध व्हावा याकरिता धावपळ करणारे केंद्र सरकार शेतकरी कांदा कमी दरात विकतो तेव्हा कुंभकर्णी झोपेत असते का , असा संतप्त सवाल शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत आलेल्या केंद्रीय ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयाचे अधिकारी अवधेश चौधरी, बीएमएस मूर्ती यांना विचारल्यानंतर या पथकाने धावतच गाडी गाठत काढता पाय घेतला. लासलगाव येथे कांदा भाव वाढल्याने वरिष्ठ अधिकारी भेट देऊन माहिती घेत आहेत. याच सप्ताहात हे दुसरे पथक आले. हे अधिकारी शुक्रवारी दुपारी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्यासह लासलगाव बाजार समितीत आले. बाजार समिती संचालक नानासाहेब पाटील व व्यापा-यांशी चर्चा केली.