उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्यांच्या आवकेत घट आली असून बाजारभावात चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. लाल कांद्यास कमाल ३९०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात लाल ( रांगडा ) कांद्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत होती. परिणामी बाजार खुपच कमी होते. परंतु चालु वर्षी कांदा रोपे टाकणीपासून ते लागवडीपर्यंत व शेवटी काढणीपर्यंत अवकाळी पाऊस, दव, धुके, रोगट हवामान आदी अस्मानी- सुलतानी संकटांमुळे कांदा उत्पादनावर विपरीत झाला . त्याचा परिणाम लाल (रांगडा) कांदा आवकेवर झाला आहे. त्यामुळे या कांद्याना सुरुवातीपासूनच चांगला दर मिळत असुन सद्यस्थितीत दिवसेंदिवस कांदा आवकेत घट येत असल्याने बाजारभावात वाढ होताना दिसून येत आहे. मागणी व पुरवठा याचे व्यस्त परिणाम झाल्याने बाजारभावात वाढ होत आहे. बाजार आवारात सुमारे सहाशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून १० हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत कमी ११०० रुपये,जास्तीत जास्त ३९०० रुपये तर सरासरी ३३०० रुपयांपर्यंत होते. महिनाभरापासून रोगट हवामान असल्याने लागवड झालेल्या कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याने आगामी काळात कांदा आवकेत पुन्हा घट येण्याची चिन्हे आहेत. बाजारभावात अजून तेजी येण्याची शक्यता कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.-------------लाल ( पावसाळी ) कांद्याबरोबरच बाजरी कापणीनंतर लागवड केलेल्या लाल (रांगडा) कांद्यावरही करपा रोगाने थैमान घातल्याने उत्पादनात मोठी घट आली आहे.त्यामुळे बाजारभाव तीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान असले तरीही मजुरी, रासायनिक खते, फवारणी आदिंसाठी झालेला खर्च बघता मिळत असलेला बाजारभाव पुरेसा नाही.- संभाजी देवरे,शेतकरी
उमराणे बाजार समितीत कांदा दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 9:53 PM