लासलगाव : येथील बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याची आवक कमी झाल्याने २२०० रुपयांपर्यंत दर मिळाला. ७३७ वाहनांतील कांद्याचे लिलाव झाले. त्यामुळे दर किमान ८०० ते २२०० रुपये, तर सरासरी १९०० रुपयांपर्यंत होते. मंगळवारच्या २३०० रुपयांच्या तुलनेत बुधवारी १०० रुपयांची घसरण झाली.केंद्र शासनाने फक्त आंध्र प्रदेशमधील कृष्णपुरम या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिली असून, दि. ३१ मार्च २०२० पर्यंत १० हजार मे. टन कांदा पाठविण्यात येणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक सुरू झालेली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटकमधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झालेला असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने तातडीने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी होत आहे.केंद्र शासनाच्या ध्येय धोरणांबाबत शेतकरी बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे केंद्राने सर्व प्रकारच्या कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या वतीने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केली आहे. गुरुवारी सायंकाळी ई-मेल करून केंद्रीय सरकारचे विविध मंत्री व अधिकारी यांच्याकडे ही मागणी जगताप यांनी व्यक्त केली आहे.
कांदा दरात १०० रुपयांनी घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:35 PM