लासलगाव : येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या कांदा दरात शनिवारी मोठी घसरण झाली. सहा दिवसांत कांदा दरात २६० प्रति क्विंटलची घसरण पहायला मिळाली. २० ऑगस्ट रोजी उन्हाळ कांदा सरासरी १७४० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला होता.
यंदा आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतून कांद्याचे चांगले उत्पादन होत असल्याने जिल्ह्यातील मागणी कमी झाली आहे. तर दुसरीकडे देशाची कांदा निर्यात सुरू जरी असली तरी आपल्या तुलनेने पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त उपलब्ध होत आहे. याचा फटका भारतीय कांद्याला बसलेला आहे. यामुळे देशात मुबलक कांदा असल्याने भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. कांदा, टोमॅटो, भाजीपाला अगदी कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
कांदा आगार असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी वर्गाने मागील वर्षीप्रमाणे चांगला भाव मिळेल या आशेवर कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या मिळणारा दर आणि झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. केंद्र सरकारने कांदा दरात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना राबविणे गरजेचे असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे.
------------------
सरासरी कांदा दर (प्रति क्विंटल)
२० ऑगस्ट - १७४०
२१ ऑगस्ट - १४८०
२२ ऑगस्ट - १४८०
२३ ऑगस्ट - १६२०
२४ ऑगस्ट - १५५१
२५ ऑगस्ट - १५८०
--------------------
कांदा निर्यात वाढविण्यासाठी केंद्राने निर्यात प्रोत्साहन योजना, ट्रान्झिट सबसिडी राबविणे आवश्यक आहे. जेणेकरून निर्यात वाढून देशाला परकीय गंगाजळी मिळेल.- मनोज जैन,कांदा निर्यातदार,लासलगाव
-------------
कोरोनानंतर कुठे बाजातपेठा सुरळीत सुरू होत असताना शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झालेला आहे. टोमॅटो, भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- रामभाऊ भोसले, शेतकरी, गोंदेगाव
(२८ लासलगाव १)
280821\28nsk_11_28082021_13.jpg
२८ लासलगाव १