नाशिक : स्वयंपाक घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तुंमधील कांद्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरूच आहे. गत पंधरवड्यात कांदा तब्बल तीस रुपयांनी घसरला आहे. मात्र, खाद्यतेलाची भाववाढ सुरूच असून, स्वयंपाकाचा गॅसही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांच्या स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाक गृहातील महत्त्वाचा घटक असलेले खाद्यतेल १६५ ते १७० रुपयांपर्यंत वाढले असून, सोयाबीन तेल १३४ ते १४० रुपयांपर्यंत पोहोचले. पामतेल १२५ ते १३० व शेंगदाणा तेल तब्बल १७५ रुपयांपर्यंत महागले आहे. डालडा तूप २५ रुपयांनी वाढून १२५ ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
--
शिमला तेजीत
बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरले असले, तरी शिमला तेजीत आहे. भोपळ्याच्या भावात दोन ते तीन रुपयांचा चढउतार सुरू असून, कोबी स्थीर आहे. मेथीची घसरण अखेर थांबली असून, दहा रुपये प्रतिजुडीने मेथी तर कोथिंबीर सात ते आठ रुपये भाव घेत आहेत.
--
संत्री ९० रुपये किलो
कोरोना काळात विटामीन ‘सी’ मिळविण्यासाठी संत्रीला मागणी वाढली आहे. सध्या संत्री ९० ते १०० रुपयांनी विकली जात आहे. त्याचप्रमाणे, सफरचंद १८० ते २०० रुपये प्रतिकिलो भाव घेत आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ग्राहकाकंडून फळांना मागणी वाढली आहे.
--
डाळींच्या भावातही तुरळक वाढ
डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे. डाळींच्या भावातही तुरळक वाढ झाली असून, तुरडाळ व चणाडाळ ५ रुपयांनी, तर उडीदडाळ दोन ते तीन रुपयांनी महागली आहे.
--
बाजारपेठेत निर्बंध लागू असल्याने ग्राहक मंदावले असून, वाढत्या महागाईमुळे ग्राहकांनी गरजेच्या तेल, मीठ मिरचीसह आवश्यक डाळी गहू, तांदूळ खरेदीवर वस्तुंवर लक्ष केंद्रित केले आहे. सामन्य कुटुंबांच्या दरमाह किराणा माल मागणीतही घट झाली आहे.
- शेखर दशपूते, किराणा व्यापारी
--
बाजारपेठेत ग्राहक नसल्याने उन्हाळा सुरू होऊनही पालेभाज्या, फळभाज्यांना अपेक्षित दर मिळत नाही. कांदा घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खुल्या बाजारात ग्राहक कमी झाल्याने, सध्या कृषिमाल खेरेदी करणाऱ्या कंपन्यांना माल विकावा लागतो आहे.
- संपत जाधव,शेतकरी
--
खाद्यतेलासोबतच डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे वार्षिक वाळवणाचे वडे, पापड यांसारखे पदार्थ तयार करणे कठीण होऊन बसले आहे. वाढत्या महागाईचा थेट परिणाम स्वयंपाक घराच्या बजेटवर होतो आहे.
अश्विनी कदम, गृहिणी