लासलगाव : बारा दिवसांच्या निर्बंधांनंतर सोमवारी (दि.२४) सुरू झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.२५) कांदा भावात सुधारणा झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लासलगावी सकाळच्या सत्रात झालेल्या कांदा लिलावात किमान ६०० ते कमाल १७५३ रुपये तर सरासरी १४६० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. लासलगाव बाजार आवारात सोमवारच्या तुलनेत दरामध्ये १५३ रुपयांची तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ६२० वाहनांतील १२८४७ क्विंटल उन्हाळ कांदा ६०० ते १७५३ रुपये व सरासरी १४६० रुपये भावाने विक्री झाला. यावेळी शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी गर्दी केली होती. बाजार समितीत ऑनलाइन नोंदीबरोबरच काऊंटरवर देखील नोंदणी केली जात होती. यावेळी गर्दी कमी नियंत्रणासाठी बाजार समिती प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला. याचबरोबर जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समिती आवारात देखील सकाळच्या सत्रात ४४० ट्रॅक्टर व ४६२ जीप अशा वाहनांतून कांदा आवक होऊन भाव किमान १००१ ते कमाल २२१४ रुपये तर सरासरी १६५१ रुपये भाव राहिला.
लासलगाव बाजारात कांदा भावात सुधारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 3:16 PM