नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर पिंपळगाव बसवंत येथे ७ हजार ९७१ रूपये इतका दर मिळाला. जिल्ह्यातील अभोणा येथील उपकेंद्रावर सर्वाधिक ८ हजार ८०० रूपये दर मिळाला.
लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत मिळाला होता. उन्हाळ कांद्यालाही चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे १३० टक्के इतके उत्पादन निघाले होते.
सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने कांद्याचे भाव दररोज वाढत आहे. अभोणा केंद्रावर ८ हजार ८०० रूपये, वणी केंद्रावर ८ हजार ७०१ तर कळवण केंद्रावर ८ हजार ५०५ रुपये दर मिळाला. आता केंद्र सरकारने कांदा आयात करू नये अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.