१४ सप्टेंबर, २०२० रोजी कांदा निर्यात बंदी केल्यानंतर उन्हाळ कांद्याचे दर सहा हजार पार झाले होते. मात्र, लाल कांदा बाजारात आल्यावर उन्हाळ कांद्याच्या दरात मोठी तफावत दिसून आली. त्यानंतर, १ जानेवारी नंतर शासनाने बंदी उठवल्यावर पुन्हा कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षाअखेर लाल कांद्याच्या दरात ८०० रुपयांची वाढ होऊन हा कांदा जास्तीतजास्त २,८९९ रुपये प्रति क्विंटल तर उन्हाळ कांद्याचा दरात ३०० रुपयांची वाढ होऊन हा कांदा २,४७० रुपये प्रति क्विंटल दरात स्थिर राहिला. मात्र, सध्या आवकेत घट होत असल्याने, लाल व उन्हाळ कांद्याने ३ हजार रुपये क्विंटल दर पार केले आहेत. मंगळवारी (दि.१९) लाल कांद्याला जास्तीतजास्त ३,३०० किंटल दर मिळाला होता, तर बुधवारी ३,४५१ दर मिळाला. जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती आवारात लाल कांद्याला किमान १,१०० रुपये तर कमाल ३,२४० रुपये दर मिळाला, तर उमराणे येथील बाजार समितीतही लाल कांद्यास सर्वोच्च ३,०५१ रुपये, तर उन्हाळी कांद्यास सर्वोच्च २,३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या आठ महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा अंतिम टप्प्यात आला असून, त्या कांद्याची प्रतवारीही कमालीची घसरली आहे. मात्र, लाॅकडाऊननंतर हाॅटेल व्यवसाय सुरू झाल्याने, उन्हाळी कांद्याला अद्यापही मागणी असून, बाजारभाव तेजीत आहेत. दिवसेंदिवस आवकेत घट होऊन कांद्याचे दर वाढत असल्याने कांदा पुन्हा एकदा उसळी मारणार, असे बाेलले जात आहे.
कोट......
सद्यस्थितीत चाळीत साठवून ठेवलेला कांदा संपला असून, बाजरी कापणीनंतर लागवड केलेल्या लाल (रांगडा) कांद्यावरही करपा रोगाने थैमान घातल्याने कांदा उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे बाजारभाव दोन ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान असले, तरीही मजुरी, रासायनिक खते, फवारणी आदींसाठी झालेला खर्च बघता मिळत असलेला बाजारभाव पुरेसा नाही.
- संभाजी देवरे, शेतकरी