नाशिक : लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांची प्राप्तिकर विभागाने तपासणी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले होते. सोमवारी (दि. १९) लिलावाची प्रक्रिया नियमित सुरू झाल्यानंतर कांदा दराने विक्रमी उसळी घेत लासलगावी ६ हजार ८९१ रुपये तर पिंपळगाव बसवंत येथे ७ हजार ९७१ रूपये इतका दर मिळाला. जिल्ह्यातील अभोणा येथील उपकेंद्रावर सर्वाधिक ८ हजार ८०० रूपये दर मिळाला. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा लाभला आहे.लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत २ हजार ९१ रूपये प्रति क्विंटल मागे जास्त इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन लाल कांद्याला ११ हजार १११ रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजारभाव लासलगाव बाजार समितीत मिळाला होता. उन्हाळ कांद्यालाही चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे १३० टक्के इतके उत्पादन निघाले होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशासह विदेशातही लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कांद्याला मागणी घटली. परिणामी, कांद्याचा उत्पादन खर्चर्ही निघणे मुश्कील झाले होते. त्यानंतर यंदाच्या पावसाळी हंगामात पावसाचा जास्त दिवस राहिलेला मुक्काम आणि परतीच्या पावसाने चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला तर शेतात नवीन लाल कांद्याच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नसल्याने कांद्याचे बाजार भावात दररोज वाढ होत आहे. सोमवारी या दराने उच्चांक गाठला. अभोणा केंद्रावर ८ हजार ८०० रूपये, वणी केंद्रावर ८ हजार ७०१ तर कळवण केंद्रावर ८ हजार ५०५ रुपये दर मिळाला.वाढते कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आधी निर्यातबंदी त्यानंतर कांद्याच्या व्यापाºयांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी करण्यात आली. आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र अनेक महिने अत्यंत कवडीमोल भावाने विक्री झालेल्या कांद्याला आज जरी चांगला मिळत असेल तरी अजूनही शेतकºयांचे नुकसान भरून निघाले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा आयात करू नये अन्यथा राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना फिरकू दिले जाणार नाही.- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना