अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवार (दि.१४) ३५४ ट्रॅक्टर्सद्वारे ८ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल ३५४० रुपये,किमान ९००रुपये तर सरासरी ३००० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला.
आखाती देशातून वाढलेली मागणी,तसेच देशांतर्गत होत असलेली मागणी याचा परिणाम भाव वाढीत झाला आहे. कसमादे पट्टयात सध्या काही प्रमाणात कांदा शित्लक असला तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांदयाचे सडण्याचे प्रमाण वाढल्याने निम्मा कांदा फेकून देण्याची पाळी कांदा उत्पादकांवर आल्याने भाव वाढीचा खूप फायदा होणार नाही.तर झालेल्या खर्चाचीच गोळाबेरीज होणार असे चित्र आहे.
लॉकडाऊनचा बसलेला जबर फटका,शेती मालाचे घसरलेले भाव याच्याच जोडीने आसमानी अवकाळीच्या दणक्याने खचलेल्या बळीराजास काहीसे सावरण्याची आशा कांदा भाव वाढीत दिसू लागली आहे. अशावेळी राजकिय हस्तक्षेपाने संयम ठेवत कधीतरी बळीराजाच्या पदरी दोन पैसे मिळू द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.