नायगाव (दत्ता दिघोळे) - सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात आता वाढलेल्या दरामुळे चर्चेत आलेल्या कांद्याबरोबर लागवडीस आलेले कांद्याचे रोप चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे आधीच अतिपावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांवर उरलेसुरल्या कांद्याच्या पिकाला चोरीचे ग्रहण लागले आहे. हे पीक चोरांपासुन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीची रखवाली करण्याची वेळ आली आहे.सिन्नर तालुक्यातील जायगाव येथिल शेतकरी भिमा लक्ष्मण गिते यांचे देशवंडी शिवारातील गट नंबर ४५१ या क्षेत्रातुन मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने लागवडीसाठी आलेले कांद्याच्या रोपांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आधीही अनेक शेतक-यांच्या चाळीतुन कांदा चोरीच्या घटना घडल्या आहे. सध्या कांदा बियाण्यांबरोबर रोपांची टंचाई झाल्याने लागवडीसाठी आलेले कांदा रोपांचीच चोरी होऊ लागल्याने परिसरातील शेत-यांमध्ये खळबळ उडाली आहे.सध्या बाजारात कांदा शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.तर परतीच्या पावसाने रोपांची व कांदा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आगामी काळातही कांद्याला चांगले दर मिळतील अशी आशा बाळगून असलेल्या शेतक-यांनी महाडी बियाणे खरेदी करून कांद्याच्या रोपांची लागवड केली आहे.अशा परिस्थतीत याच मोल्या महागाच्या कांदा रोपांचीच चोरी होऊ लागल्याने बळीराजा धास्तावला आहे.नायगाव खो-यात गेल्या काही दिवसांपासुन भुरट्या चोर्यांच्या घटना वाढल्या आहे.त्यातही शेतातील औजारे, कृषी पंप, केबल आदी वस्तूंच्या चो-यांची संख्या वाढली आहे.
दरवाढीमुळे आता कांदा रोपांचीही चोरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 3:08 PM