सटाणा : शहरातील मालेगाव रोड वरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दिपक सोनवणे यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत कांदा व्यापारी हरिश्चंद्र गुलाब सोनवणे (रा.चौगाव रोड, सटाणा) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरिश्चंद्र सोनवणे व दीपक सोनवणे हे दोघे गेल्या आठ वर्षांपासून डी.आर.ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून सटाणा - मालेगाव राज्य महामार्गावर रावळगाव फाट्याजवळ त्यांचे दुकान आहे. दिवसभर त्यांनी दुकानात शेतकऱ्यांकडून कांदे खरेदी करून त्यांना पेमेंट केले. सायंकाळी साडेसात वाजता कार्यालय बंद करताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले १ लाख ९५ हजार ७११ रुपये दुकानातील टेबलाच्या ड्रावरमध्ये ठेवले दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता दुकानावर जाताच सोनवणे यांना दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमधील टेबल व त्यातील वस्तु इतरस्त फेकलेल्या आढळून आल्या. ड्रावरमधील १ लाख ९५ हजार ७११ रुपये तसेच दुकानातील दहा हजार रूपयांचा सॅमसंग कंपनीचा २१ इंची एलईडी टीव्ही आणि नऊ हजार रुपये किमतीचे पैसे मोजण्याचे मशीनही गायब असल्याचे दिसून आले. यावेळी सोनवणे यांनी तत्काळ सटाणा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली असून त्यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, वर्षा पवार व पोलिस नाईक अतुल आहेर पुढील तपास करीत आहेत.
सटाण्यात कांदा व्यापाऱ्याचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 5:18 PM