श्याम बागुलनाशिक : रब्बीच्या लागवडीसाठी आॅक्टोबरमध्ये लावलेली रोपे वाहून गेली, तर डिसेंबरमध्ये लागवड करावयाच्या खरिपाच्या कांद्यासाठी बाजारात बियाणे मिळत नसल्याने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या कांद्याची पुढच्या वर्षी तीव्र टंचाई निर्माण होऊन संपूर्ण वर्षभर कांदा ग्राहकांना रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाजारात बियाण्यांची वानवा पाहता, त्याचेही दर गगणाला भिडल्याने ज्या शेतकऱ्यांना कांदा लागवड करावयाची आहे, त्यांचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.
कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून कांदा दराच्या चढ-उतारामुळे कधी शेतकऱ्यांना तर कधी ग्राहकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. आॅक्टोबर महिन्यात बाजारात आलेल्या लाल (रांगडा) कांद्याला चांगला भाव मिळून शेतकरी वर्ग आनंदीत झालेला असताना त्यांच्या आनंदावर अवकाळी पावसाने पाणी फेरले आहे. २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे खळ्यावर काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्यामुळे खाण्यायोग्य राहिलेला नाही. मुळातच हा कांदा फारसा टिकत नाही, त्यातच पावसात भिजल्यामुळे त्याला बदललेल्या हवामानामुळे कोंब फुटू लागले आहेत. परिणामी कांद्याचे मार्केट तेजीत राहण्याची शक्यता आता दिसत नाही. असे असताना शेतकºयांनी रब्बीच्या लागवडीसाठी लावलेली रोपेदेखील अवकाळी पावसामुळे वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० ते २२ हजार हेक्टरवरील रोपे वाहून गेली असून, त्यामुळे रब्बीसाठी शेतक-यांना आता नव्याने कांदा रोपांची लागवड करावी लागणार आहे. साधारणत: रोपे तयार होण्यास महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये रब्बीच्या कांद्याची लागवड पूर्ण केली जाते. परंतु यंदा अवकाळी पावसामुळे रोपेच वाहून गेल्याने व जी काही रोपे अवकाळी पावसामुळे बचावली त्यांच्यावर अति पावसामुळे करपा रोगाची लागवड झपाट्याने होत आहे. त्यामुळे नवीन रोपे लागवड करण्यास लागणारा कालावधी पाहता, रब्बीची लागवड लांबणीवर पडण्याची किंवा कांदा लागवडच रद्द करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. एकीकडे रब्बीची लागवड करताना दुसरीकडे शेतकरी खरिपाच्या कांदा लागवडीची तयारी वर्षानुवर्षे करीत आला आहे. यंदा शेतक-याचा नित्यक्रम बदलणार आहे. रब्बीच्या कांद्याच्या लागवडीची परवड झालेली असताना उन्हाळी कांद्याची डिसेंबरमध्ये लागवड करण्यासाठी बाजारात शेतक-यांना कांद्याचे बियाणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. डिसेंबरमध्ये लावलेला कांदा एप्रिल, मे महिन्यात बाजारात येतो. जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे जवळपास एक लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र आहे. रब्बीचे क्षेत्र फारसे नसले तरी, उन्हाळी कांदा बाजारात येईपावेतो रब्बीचा कांदा ग्राहकांची मागणी व उपलब्धता याचे संतुलन राखण्यास उपयोगी ठरत होता. आता मात्र उन्हाळी कांद्यासाठी बियाणे मिळत नसल्याने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टरवर कांद्याचे पर्यायी काय उत्पादन घ्यावे, असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे. त्यामुळे तीव्र टंचाईमुळे कांद्याचे दर वाढतील परिणामी ग्राहकांचे बजेट कोलमडून कांदा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.