विंचूर : लासलगाव व विंचूर बाजार आवारात मनमाड, चांदवड, येवला येथून कांदा विक्रीसाठी येत असतो. मात्र, बाजारपेठा बंद असल्याने कांदा शेतात पडून आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता शासनाने लॉकडाऊन लावलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळत नसल्याने कांदा कडक उन्हात पडून आहे. त्यातच बाजार समित्याही बंद असल्याने तसेच कांदा साठवणुकीची पंचाईत झाल्याने बरेच कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विंचूर उपबाजार आवारावर कोविडच्या पार्श्वभूमीवर लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे रांगडा व लाल कांदा अद्याप शिल्लक आहे. रांगडा व लाल कांदा जास्त दिवस चांगल्या अवस्थेत टिकू शकत नसल्याने शेतकरी तो तत्काळ बाजारात आणत असतो. मात्र, बाजार समितीतील व्यवहार बंद असल्याने उन्हाळ कांद्यासह इतर शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. मागील महिन्यात मार्चअखेरीचे कारण पुढे करून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आठ ते दहा दिवस बंद ठेवल्या. त्यामुळे हजारो क्विंटल कांदा विनाकारण पडून राहिला. त्याचा परिणाम लिलाव सुरळीत झाल्यावर आवक वाढली व कांद्याचे दर घसरले. परिणामी त्याचे नुकसान शेतकरी वर्गाला भोगावे लागले. कांदा नाशवंत आहे. अगोदरच बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे.
--------------------------
करपामुळे उत्पादनात घट
एकीकडे अवकाळी पाऊस व त्यामुळे कांद्यावर आलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. त्यामुळे कांदा उत्पादक हैराण झाले आहेत. बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे बंद राहिल्याने शेतमालाच्या प्रतीवर परिणाम होऊन शेतमालाचे दरही कमी होतात. बंदचा कालावधी संपल्यानंतर, बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल एकदम विक्रीस येतो आणि आवक वाढल्यामुळे पुन्हा या शेतमालाचे दर पडतात. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होत असते. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.
----------------------
सरकारने हमीभावाने कांदा खरेदी करावा किंवा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून बाजार समित्यांमधील लिलाव पूर्ववत सुरू करावा. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांच्या हक्कासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
- कुबेर जाधव, राज्य संपर्क प्रमुख, कांदा उत्पादक संघटना. (२८ कुबेर जाधव)
-----------------
पणन मंडळाच्या आदेशानुसार तीन दिवसांच्यावर समिती बंद ठेवता येत नाही. असे असताना लिलाव बंद करून कांदा उत्पादकांवर अन्यायच केला जात आहे.
- कृष्णा जाधव, उपजिल्हाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना. (२८ कृष्णा जाधव)
--------------
शेतात पोळ करून कांदा साठवताना शेतकरी सोमनाथ घायाळ. (२८ विंचूर)