नाशिक : कलेची प्रत्यक्ष अनुभूती अर्थात नजरेसमोर सादर केला जाणारा कलाविष्कार हा जितका पराकोटीचा आनंद देऊ शकतो, त्या तुलनेत कोणत्याही स्क्रीनवर ती अनुभूती येणेच शक्य नाही. या वास्तवाबाबत सर्व रसिकप्रेमींचे एकमत असले तरी त्यापेक्षा भयावह असलेले कोरोनाचे वास्तवही नजरेआड करणे कुणालाच शक्य नाही. त्यामुळे दोन्ही वास्तवांचा सामना करताना मग दुधाची तहान ताकावर भागवली जात आहे, ती ऑनलाईन कार्यक्रमांनी. गत वर्षभरापासून परिसंवाद, व्याख्यानमाला, गायन, नृत्य, वादन, नाट्यछटा यांसारख्या सांस्कृतिक उपक्रमांच्या ऑनलाईन स्वरुपातील सादरीकरणात वाढ होऊ लागली असून, गत महिन्यापासून हे ऑनलाईन उपक्रम प्रेक्षकांना रुचत असल्याने एकप्रकारे बहरू लागल्याचेच चित्र दिसून येत आहे.
सार्वजनिक वाचनालयाने गत महिन्यात घेतलेल्या शब्दजागर उपक्रमातील काही व्याख्यानांना लाभलेला प्रतिसाद हा एक-दीड हजारांच्या पुढे होता. म्हणजे प. सा. नाट्यगृहात जरी प्रत्यक्ष कार्यक्रम झाला असता, त्या तुलनेतही दुपटीपेक्षा अधिक प्रतिसाद या व्याख्यानांना लाभला होता. तसेच या व्याख्यानांना लाभलेला रसिकदेखील केवळ शहर किंवा राज्यापुरता मर्यादीत नव्हता. तर देश, विदेशातील रसिक त्यात सहभागी झाले होते. त्याप्रमाणेच अन्य संस्थांच्या उपक्रमांनाही याचप्रकारे भरभरून प्रतिसाद लाभला. म्हणजे खऱ्या अर्थाने ती व्याख्याने, परिसंवाद, वैश्विक ठरू लागली आहेत. त्याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे संबंधीत आयोजक संस्थांना त्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लागणारा निधी पूर्वीच्या पद्धतीच्या तुलनेत एक दशांशपेक्षाही कमी आहे. एखाद्या कार्यक्रमाला वक्ते, कलाकार, प्रमुख पाहुणे बोलावल्यानंतर त्यांची येण्या, जाण्याची व्यवस्था, निवासाची सोय, मानधन, सभागृहाचे भाडे आणि अन्य डझनावारी बाबींना अशा ऑनलाईन उपक्रमांतून फाटा देणे शक्य होते. तसेच अशा ऑनलाईन उपक्रमांना मिळणारा रसिकदेखील खरा रसिक असतो. उगीच बाजारात फिरत फिरत आलो होतो, म्हणून थोडावेळ डोकावलो आणि अगदी मुख्य वक्त्याचे भाषण सुरू व्हायच्या वेळी किंवा अगदी भाषण नुकतेच सुरू झालेले असताना मध्यातून उठून जात रंगाचा बेरंग करणाऱ्या
तथाकथित रसिकांचा त्यात हस्तक्षेप नसतो. या सर्व बाबींची अनुभूती अशा उपक्रमांच्या आयोजकांना आता हळूहळू येऊ लागली आहे. त्यातून मूळ मुद्दा केवळ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये मोडल्या जाणाऱ्या कलांचा विषय सोडला तर व्याख्याने, परिसंवाद, सत्कार सोहळे याबाबत कोरोना काळानंतरच्या भविष्यातही ऑनलाईनचा ट्रेंड कायम राहिला तरी आश्चर्य वाटू नये. क्वचितप्रसंगी प्रत्यक्ष व्याख्याने, परिसंवाद सभागृहांमध्ये आयोजित करतानाच ती ऑनलाईन करण्याचा ट्रेंडदेखील कायम राहिल्यास नवल वाटणार नाही. ---------
फोट
१२सांस्कृतिक
-----------------
सांस्कृतिकायन
धनंजय रिसोडकर