साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या भक्तांची संख्या देशभर आहे. प्रामुख्याने गुजरात व महाराष्ट्रातील बहुसंख्य भाविक या देवीला कुलदैवत मानतात. चैत्र यात्रोत्सव व नवरात्र अशा दोन उत्सवात लाखोंच्या संख्येने हजेरी असते तर उर्वरित दिवसांतही हजारो भाविक सप्तशृंगीच्या दर्शनासाठी उपस्थित असतात. तसेच वणीची जगदंबा देवी ही सप्तशृंगी देवीची ज्येष्ठ भगिनी असल्याची मान्यता आहे. सप्तशृंगी देवीचे मूळ स्थान अशीही ओळख या स्थानाची आहे. सप्तशृंगी देवीपुढे केलेला नवस वणीच्या जगदंबेपुढे फेडला तर चालतो. मात्र, जगदंबा देवीपुढे केलेला नवस हा जगदंबा देवीपुढेच फेडावा लागतो. तसेच सप्तशृंगीचे दर्शन घेतल्यानंतर जगदंबेचे दर्शन घेतले तरच सफलता मिळते व पुण्य पदरी पडते अशी भाविकांची श्रद्धा आहे. जगदंबा देवी मंदिरातही नवरात्र व चैत्रोत्सव साजरा होतो. या उत्सवाचे स्वरुप भव्य असते. तर नित्यनेमाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. मात्र, गेल्या वर्षभराहून अधिक कालावधी लोटला आहे. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुरोहितांची पूजा वगळता मंदिरे बंद करण्यात आली आहेत. यामुळे उत्सव व दर्शनही बंद ठेवण्यात आलेले आहेत. भाविक भक्त व दर्शनार्थी यांना दर्शनप्राप्तीचा आनंद प्राप्त व्हावा यासाठी देवीचा साजशृंगार पुरोहितांच्या हस्ते पूर्ण झाल्यानंतर देवीचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात येतो व नित्यनेमाने भाविक दर्शन घेऊन कृतकृत्यता अनुभवतात. या सकारात्मक उपक्रमशील भूमिकेला अपेक्षित प्रतिसाद मिळत असून दर्शनाची अनुभूती या भावनेतून होत आहे.
सप्तशृंगीसह जगदंबा देवीचे ऑनलाईन दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:10 AM