नाशिकरोड : एटीएम बंद असल्याचे सांगून पीनकोड क्रमांक वदवुन आयसीआयसीआय बॅँकेच्या ग्राहकांच्या खात्यातुन आॅनलाईन ९०हजार रुपये आपल्या खात्यात जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंधर्वनगरी लोकमान्यनगर येथील सुहास मोरेश्वर सौंदतीकर यांचे नाशिकरोडच्या आयसीआयसीआय बॅँकेत खाते आहे. सौंदतीकर यांना गेल्या १ जून रोजी दुपारी मोबाइलवर मिश्रा नावाने एका इसमाचा फोन आला. ‘मी मुंबईच्या आयसीआयसीआय बॅँकेतून बोलत आहे. तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. तुमच्या मोबाइलवर एक संदेश पाठवितो. त्यातील तुमचा सहा अंकी पीनकोड नंबर सांगा, मी तुमचे एटीएम कार्ड पुन्हा चालू करून देतो,’ असे सांगून सौंदतीकर यांच्याकडून आयसीआयसीआय बॅँकेचा खाते क्रमांक व पीनकोड नंबर वदवून घेतला. त्यानंतर काही मिनिटांतच सौंदतीकर यांच्या खात्यातून ९० हजार ५०० रुपये आपल्या खात्यात आॅनलाइन जमा करून घेतले. त्यानंतर सौंदतीकर यांना आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा एसएमएस आला. सौंदतीकर यांनी लागलीच बॅँकेत व उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व माहिती सांगितली. सौंदतीकर यांच्या खात्यातून वर्ग झालेली रक्कम बिहार आयसीआयसीआय बॅँकेच्या शाखेत खाते असलेल्या नरेन्द्र यादव यांच्या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीचे अपहरणनांदूरगाव येथील १७ वर्षांची मुलगी गुरुवारी सायंकाळी आईसोबत जेलरोड कलानगर येथे मामाच्या घरी आली होती. ही मुलगी ‘खाली जाऊन येते’ असे सांगून घरातून गेली. त्यानंतर तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईगिरी करणारे दोघे ताब्यातवास्को हॉटेल चौकात गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता हातात चाकू घेऊन सार्वजनिक ठिकाणी भाईगिरी करत दहशत माजविणाऱ्या सुमित अविनाश निरभवणे (वय २१), रा. गोल्डलाईट सोसायटी, बिटको महाविद्यालयामागे यास नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकरोड बसस्थानक परिसरात गुरुवारी मध्यरात्री हातात चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या गणेश तुकाराम आखाडे (रा. उत्तमनगर, सिडको) या युवकास नाशिकरोड पोलिसांनी पकडून कारवाई केली आहे.महिलेस मारहाणजेलरोड नारायणबापूनगर येथे पती-पत्नीस शिवीगाळ, दमदाटी करून महिलेच्या पायावर लोखंडी रॉड मारून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नारायणबापूनगर येथील शारदा अनिल पठाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या रविवारी दुपारी मिरच्या वाळत घालण्याच्या कारणावरून कुरापत काढून ज्योती पवन पगारे व पवन पगारे यांनी शारदा व पती अनिल पठाडे यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. पवन पगारे यांनी शारदा पठाडे यांच्या पायावर लोखंडी रॉडने मारून दुखापत केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
एटीएम पीन घेऊन आॅनलाइन फसवणूक
By admin | Published: June 12, 2015 11:55 PM